October 2018

नमस्कार मंडळी,
BMM 2019 अधिवेशनामध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांच्या निवडप्रक्रियेने आता चांगलाच जोम धरला आहे. कार्यक्रम निवडसमितीचा प्रमुख या नात्याने ह्या प्रक्रियेबद्दलच्या ठळक बाबींची माहिती आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या समितीमध्ये माझ्याबरोबर संजय भट आणि संजू आडारकर सहप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  त्याचबरोबर आमच्या कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे प्रमुख मंदार जोशी, सहप्रमुख विदुला खाडिलकर आणि अपर्णा कुलकर्णी यांची समिती कार्यक्रमांची निवड झाल्यावर ते उत्तमोत्तम प्रकारे कसे सादर करता येतील आणि त्यासाठी लागणारी व्यवस्था कशी करता येईल याचा सखोल आराखडा बांधत आहेत.आमच्यासोबत जवळपास ५० कार्यकर्ते आमच्या या समितीचा कार्यभार सांभाळत आहेत.
आमच्या दृष्टीने अधिवेशनातील कार्यक्रम कसे असतील याचे चित्र आम्ही तयार केलेल्या इन्व्हिटेशन व्हिडिओच्या गीतातील काही कडव्यांमध्ये आधीच उभे केले होते. त्या ओळी इथे पुन्हा उधृत करीत आहे.
“नाटक चर्चा गप्पा गाणं
कथाकथन अन् कवितावाचन
स्पर्धा मुलाखत अन् भाषण
सगळ्यांची लज्जत चाखायला हो, येणार ना आमच्या गावाला?
प्रदर्शन आणि कलादालनं
समारोप आणि उद्घाटन
वेळेची कसरत जोडीला हो, येणार ना आमच्या गावाला?
गायक वादक तसेच नर्तक
नट नाट्य आणि दिग्दर्शक
लेखक कवी आणि स्पर्धक
व्हा आता तयार चमकायला हो, येणार ना आमच्या गावाला?”
आता यापैकी स्पर्धा, स्पर्धक याबद्दल आम्ही काही ठोस पाऊले उचलली आहेत ती अशी…
आम्ही खालीलप्रमाणे चार स्पर्धा आणि परीक्षकांनी निवडलेली चित्रे, छायाचित्रे यांची दोन प्रदर्शने या अधिवेशनाच्या निमित्ताने भरवत आहोत.
१) “आमची भाषा ढोल ताशा” (ढोल ताशा स्पर्धा)
२) “नृत्यरंग” (समूह अथवा सांघिक नृत्य स्पर्धा)
३) “सारेगम “(उपशास्त्रीय अथवा भावगीत गायन स्पर्धा)
४) “वाह उस्ताद” (शास्त्रीय गायन स्पर्धा)
५) “रंग माझा वेगळा” (निवडक चित्रकला प्रदर्शन)
६) “टिपलेले क्षण” (निवडक छायाचित्र प्रदर्शन)
या अधिवेशनातील नावीन्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्पर्धा/प्रदर्शनांच्या प्राथमिक फेऱ्या Online Photo/Video Submissions द्वारे घेतल्या जातील. ह्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांना या स्पर्धांमध्ये भाग घेता येईल अशी आम्हाला आशा आहे. या प्रत्येक कलाक्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी ह्या स्पर्धा अन् प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून आम्हाला सहाय्य करत आहेत. त्याचबरोबर स्पर्धांच्या काही भागांमध्ये Public Online Voting द्वारे निवड करण्याचाही आमचा मानस आहे. आमच्या समितीमधील शर्मिला जपे, नचिकेत देशपांडे, रोहिणी राऊत आणि  इतर काही कार्यकर्ते या स्पर्धांच्या आयोजनासाठी दिवसरात्र झटत आहेत. विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेतील आणि  या स्पर्धांच्या माध्यमातून जनतेसमोर येतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
स्पर्धांव्यतिरिक्त वर नमूद केल्याप्रमाणे प्रमुख वक्ते आणि मान्यवर पाहुण्यांच्या नावांबाबत  आमचा आणि BMM समितीचा विचारविनिमय चालू आहे. आमच्यापैकी अमरनाथ ठोंबरे, पुलकेशी जपे, प्रिया कर्णिक आणि इतर काही मंडळी आमच्या उदघाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात मग्न आहेत.
तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा योग्य त्या प्रमाणात समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही कलाकारांना आपापल्या कार्यक्रमांचे प्रस्ताव आमच्या संकेतस्थळावरून पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. असे प्रस्ताव पाठवण्याची मुदत नुकतीच १५ सप्टेंबर रोजी संपली. आम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होतो की जगभरातील कलाकारांनी आमच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद दिला. अशा प्रकारचे २०९ उत्तम दर्जाचे प्रस्ताव आम्हाला या माध्यमातून आले आहेत..
या सर्व प्रस्तावांची प्राथमिक छाननी करण्याचे काम नाटक, नृत्य, संगीत, विविध, शैक्षणिक/माहितीपर अशा विभागांनुसार अनुक्रमे पुलकेशी जपे, वैष्णवी आपटे, राजश्री गोरे, प्रसन्न वाराणशीवार आणि स्मिता राणे ही मंडळी करत आहेत. त्यानंतर आमच्या सर्व समितीतील सर्व कार्यकर्ते ह्या प्रस्तावांचे मूल्यमापन नियोजित पद्धतीने करत आहेत. यापैकी काही मोजक्या प्रस्तावांबाबतचे निर्णय लवकरच म्हणजे १५ ऑक्टोबरच्या दरम्यान प्रस्तावकर्त्यांना कळवण्याची आमची योजना आहे. मात्र बहुसंख्य प्रस्तावांबाबतचे अंतिम निर्णय १५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रस्तावकर्त्यांपर्यंत पोहोचतील असा आमचा अंदाज आहे.
एकूणच मिळालेल्या प्रस्तावांवरून नजर फिरवल्यावर असे वाटते की यातून काही मोजकेच प्रस्ताव स्वीकारण्याचे दिव्य आम्हाला पार पाडायचे आहे. तरीसुद्धा अधिवेशनातील उपस्थितांसाठी हे कार्यक्रम म्हणजे “जो जे वांछील तो ते लाहो” असा आनंदसोहळा असेल हीच आमच्या समितीची मनोकामना आहे.
किरण  साठ्ये, कार्यक्रम निवडसमिती प्रमुख, BMM 2019