November 2018

“दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी,
आमच्या घरी अन तुमच्या घरी!”
 
प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार श्री. यशवंत देव यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या ह्या गीताचे शब्द आठवले.  यंदाची दिवाळीही आता आठवड्यावर आलेली आहे. डॅलस मध्ये मात्र यावर्षी ही दिवाळी पुढले नऊ महिने असणार अशाच प्रकारचं उल्हसित वातावरण सध्या सर्व मराठी घरांमध्ये आहे.
 
आपलं अधिवेशनही दिवाळीच्याच उत्साहात सजवावं आणि सर्वांना आनंदित ठेवावं हीच भावना मनात ठेवून गेल्या शनिवारीच म्हणजे ऑक्टोबर २० रोजी झालेल्या “ऑल हँड्स मीटिंग” मध्ये सर्व कार्यकर्ते वावरत होते. प्रथेप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात झाल्यानंतर, एक हलका फुलका खेळ सर्वजण खेळले. इंग्रजीत त्याला आपण ice breaker म्हणतो तसा. दर महिन्याला स्वयंसेवकांची संख्या वाढत असल्याने काही नवीन लोकांची एकमेकांना ओळख होणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत आपापल्या ठराविक समितीमध्ये काम जरी सर्वजण करत असले तरी यापुढे काही समित्यांना एकत्र काम करावे लागणार आहे म्हणूनही एकमेकांच्या कार्याच्या प्रगतीची ओळख करून घेणे आवश्यक होते.
त्यानंतर संयोजक दिलीप राणे यांनी साधारण एक तास आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.  BMM ला पाठवलेल्या प्रस्तावाशी तुलना केली आणि त्या प्रस्तावात सादर केलेल्या आश्वासनांपैकी जवळ जवळ ९० टक्के  गोष्टींची अंमलबजावणी होते आहे हे पहाता सर्वाना बरेच समाधान वाटले. नवीन कोरी  करकरीत वेबसाईटही  सर्वांसमोर सादर केली. ही नवीन वेबसाईट पहिल्याच भेटीत  सर्वांवर छाप मारून गेली!  अतिशय पद्धतशीर रित्या सुकाणू समितीने ही बैठक आयोजित केली होती. लोकांच्या मनात नेमकं काय आहे  हे काढायला आमच्यातले खेळकर हर्षद खाडिलकर यांनी चॉकोलेटचं आमिष सर्वांना दाखवलं आणि मग काय प्रश्नांवर  प्रश्न….आणि बैठकीत चॉकलेटचा वर्षाव सुरु झाला. जेंव्हा त्यातल्या साखरेची काळजी सर्वाना वाटायला लागली तेंव्हा कुठे प्रश्नांचा ओघ हळूहळू कमी झाला! 😀
 
Interactive पद्धतीने घेतलेल्या या सभेमध्ये आलेले सर्वच लोक सहभागी झाले आणि खरंच आनंदाची गोष्ट म्हणजे त्यातून बऱ्याच नवीन आणि चांगल्या कल्पना बाहेर आल्या. यशस्वी अधिवेशन म्हणजे कसं असावं याची चर्चा झाली. आलेले अतिथी, निमंत्रित कलाकार, आपले देणगीदार, प्रायोजक, Expo मध्ये येणारे व्यावसायिक आणि आमचे स्वयंसेवक या सर्वांना सुखद अनुभव देणारं  हे अधिवेशन असावं यावर कुणाचंच दुमत नव्हतं. त्यामुळे आता ही आव्हाने कशी पेलायची आणि त्यासाठी काय करावे लागेल या चर्च मध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घेतला आणि पुढील तीन महिन्यांसाठी कोणत्या बाबींवर लक्ष्य केंद्रित करायचे हे ठरवण्यात आले. लोकांचा उत्साह इतका दांडगा होता की business conference च्या समितीने त्यांचा आराखडा चक्क एका  गमतीशीर skit च्या सहाय्याने करून दाखवला. यात मराठी स्त्रियांना  सुद्धा आपल्या कुटुंबातील आर्थिक गुंतवणुकीची माहिती आणि त्याचबरोबर असलेले कायदे माहित असणे किती महत्वाचे आहे ते पटवून दिले आणि ह्या business conference मार्फत अशी माहिती त्या मिळवू शकतील अशी ग्वाही जयंत कुलकर्णी, संदीप गोरे आणि प्रतिभा गायके यांनी दिली आणि स्त्रियांनी ह्यात भाग घ्यावा असे आवाहन केले.
 
उत्तररंग समितीनेही आयोजिलेल्या लघुलेख स्पर्धेबद्दल माहिती दिली – स्पर्धेचं नाव आहे “वय मोठं गंमतीचं”उतारवय हे काही फक्त आजार आणि व्याधींवर चर्चा करण्यासाठी नाही, तर आनंदाने हसत खेळत आयुष्याकडे पाहण्यासाठीही आहे. याच विचारास अनुसरून, अधिवेशनाचा एक भाग म्हणून ही लघुलेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नावाप्रमाणे, उतार वयात घडणाऱ्या विविध गंमतीजमती शब्दबध्द करण्याची संधी यानिमित्ताने तुमच्यातील लेखकाला मिळणार आहे.
 
सर्वांना उत्सुकता असते ती कार्यक्रमांबद्दल. समितीने याबाबतची थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे २०९ प्रस्ताव आलेले आहेत . त्या प्रस्तावांच परिक्षण करायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हे. आमच्या कार्यक्रम समिती मधील जवळजवळ ३० कार्यकर्ते/जाणकार प्रत्येक प्रस्ताव पडताळून पाहत आहेत जेणेकरून कोणत्याही चांगल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष्य होऊ नये. भारतातून येणाऱ्या कार्यक्रमांमधून काही ठराविक कार्यक्रम आमच्या कार्यक्रम समितीने निवडलेले आहेत आणि ते लवकरच जाहीर होऊ लागतील. या आधी जाहीर केल्या प्रमाणे बऱ्याच स्पर्धा आता सुरु आहेत आणि काही  प्रवेशिका यायला सुरुवातही झाली आहे. या अधिवेशनांतर्गत प्रथमच हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. अमेरिकेत कित्येक विद्यार्थी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असेल. तसेच आपले अभिजात संगीत जपण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ भारताबाहेर उपलब्ध होण्याची गरज आहे हे जाणून आम्ही ही एक अभिनव कल्पना राबविली आहे. इतर कलागुणांचे संवर्धन व्हावे म्हणून छायाचित्र स्पर्धाचित्रकला स्पर्धाढोल-ताशा स्पर्धासमूहनृत्य स्पर्धासा रे ग म, अशा विविध स्पर्धांचे आयोजन या अधिवेशनात करण्यात आलेले आहे. अर्थात या स्पर्धा किती यशस्वी करणं सर्वस्वी तुम्हा सर्वांच्या हातात आहे. 
 
उदघाटन समारंभाची मुख्य कल्पना आणि त्याच्या सरावाचं काटेकोररित्या आखलेलं वेळापत्रक याची पुलकेशी जपे यांनी थोडक्यात माहिती सर्वांना सांगितली. या उदघाटन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या उत्सुक  कलाकारांना त्यांच्या जबाबदारीचीही आठवण करून दिली गेली. 
सांस्कृतिक कार्यक्रम करताना या अधिवेशनातून काही चांगली कार्ये घडावी या हेतूने अधिवेशनामध्ये NGO summit भरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशन या संस्थेच्या सहकार्याने हे घडवून आणण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत ही माहितीसुद्धा दिल्यावर सर्वच जणांनी या गोष्टीबद्दल चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
 
एव्हाना सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला  लागले होते. ही गोष्ट आमच्या चाणाक्ष संयोजकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.  ‘ पाव भाजी येतेय.. ‘ हे वाक्य त्यांनी सभागृहात टाकलं आणि एकाच हशा पिकला. अडीच तास चाललेल्या या चर्चेनंतर गरमा गरम पावभाजी, कोथिंबीरवडी आणि चहा यांचा मनसोक्त आनंद लोकांनी घेतला.  डॅलस येथील अतिशय उत्साही उद्योजिका प्रिया कुलकर्णी शहा आणि रश्मी साठ्ये यांनी त्यांच्या ‘महाराजा’ उपाहारगृहातर्फे स्वयंसेवकांना दिलेली ती एक प्रेमळ भेट होती. यानंतर एकत्रित येऊन थोडी मजाही करावी म्हणून बऱ्याच जणांनी karaoke वर हिंदी-मराठी गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन केले. अधिवेशनाचं प्रतीकचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (slogan) वापरून केलेल्या फोटोफ्रेमच्या साहाय्याने सर्वांना फोटो काढण्यातही उत्साह आला.
 
डॅलस मध्ये बऱ्याच दिवसांनी त्या दिवशी सूर्यराजाने दर्शन दिले होते. छान वातावरण, कोपेल मधील निसर्ग केंद्रात भरलेली सभा, सभोवतालची झाडी, चविष्ट पदार्थ, एकमेकांचं ऐकून घेण्याची तयारी आणि एकोप्याने काम करण्याचा हुरूप यामुळे या पुढला प्रवास हा अतिशय मजेचा होईल हे निश्चित!