May Newsletter 2018

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट 

माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवित 

'या रे, या रे' अवघे जण, हाक माय मराठीची 

बंध खळाळा गळाले, साक्ष भीमेच्या पाण्याची 

वि. म. कुलकर्णी यांच्या कवितेचे हे शब्द आठवले की  वाटतं, इतकी वर्षं मातृभूमीपासून दूर राहूनही ही मराठीची गोडी आपल्या सर्वांसाठी कुठेही कमी झालेली नाही. याच माय मराठीच्या हाकेमुळे आपल्या सर्वांची पाऊले नकळतच दर दोन वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनाकडे वळतात, आपल्या मराठीची गोडी अजूनही वाढवण्यासाठी, तेच छंद जोपासण्यासाठी, नवे बंध जोडण्यासाठी आणि मराठी संस्कृती, कला, साहित्य, सामाजिक कार्य, उद्योगांतील यश साजरे करण्यासाठी. २०१९ चे अधिवेशन मग कसं असावं?

जवळ जवळ ५००० मराठी एका छताखाली जमलेले. जिकडे तिकडे मराठी संभाषण ऐकू येतंय आणि सर्व कसं शिस्तबद्ध चाललंय. अमेरिकेने ही शिस्त आपल्याला शिकवली. ३०-४० फुटांच्या प्रशस्त प्रवेशद्वारापाशी पाश्चात्य तंतूवाद्यांवर एक ऑर्केस्ट्रा मराठी गाण्यांचे मधुर सूर वाजवतोय. अधूनमधून सनईचे सूरही वाजतायत.  आवारात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. फुलाफुलांनी सजवलेली कमान. मोठाल्या चार-पाच दालनांमध्ये विविध प्रकारचे, अतिशय उत्कृष्ट दर्जाचे कार्यक्रम चाललेले.  प्रशस्त arena मध्ये ९० फूटी व्यासपीठावर आणि त्याला लागूनच असलेल्या सभागृहात व्यावसायिक दर्जाचे, हृदयाला भिडणारे आणि बुद्धीला पटणारे कार्यक्रम. बाहेर अमराठी आणि अमेरिकन लोकांची ही गर्दी जमलेली, ढोल ताशा आणि लेझीमच्या तालावर होणारी भव्य यात्रा पाहण्यासाठी. अमेरिकन मीडियाने सुद्धा या गोष्टीची दखल घेतलेली आणि ५-१० विडीयो कॅमेरा हे सर्व टिपण्यासाठी सज्ज झालेले. एका मोठ्या हॉलमध्ये मराठी चित्रकारांची उत्कृष्ट पेंटिंग्ज मांडलेली, त्याचबरोबर छायाचित्रकारांनी अचूक टिपलेले क्षण दाखवणारी छायाचित्रे प्रदर्शित केलेली. मुलखावेगळी अनेक मराठी माणसे कितीतरी चांगली कार्ये कुठलाही गाजावाजा न करता जगभरात करतायत. अशा व्यक्तींना खास आमंत्रण देऊन त्यांचं महान कार्य सर्वांसमोर मांडलेलं. असा हा सोहळा साजरा करताना इथल्या भूमीशी असलेलं सामाजिक नातंही आपण सांभाळतोय अशा प्रकारचं आपलं संमेलन असावं हे स्वप्न आम्ही पहातोय. 

असं हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे. आम्हाला अतिशय आनंद होतोय आपणां  सर्वांना सांगण्यात की २०१९ च्या अधिवेशनासाठी लागणारे कन्व्हेंशन सेंटर आपल्याला मिळालेलं आहे. अधिवेशन स्थळ म्हणून Kay Bailey Hutchison Convention Center Dallas (KBHCCD) बरोबरच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. ह्या भव्य सेंटर मध्ये आपलं अधिवेशन भरवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कन्व्हेंशन सेंटरला लागूनच असलेलं अद्ययावत Omni हॉटेल, एरिना, सभागृह आणि मोठमोठाली दालनं अशा सुविधा असलेल्या ह्या सेंटर मध्ये "आपलं मराठमोळं अधिवेशन" गाजणार यात मुळीच शंका नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे सहज शक्य आहे. मोठ्या संख्येने ह्या अधिवेशनाला यावे, यात भाग घ्यावा, आणि आम्हां सर्वांबरोबर तुम्हीही हे स्वप्न साकारावे ही आमची इच्छा. 

याबरोबर अर्थातच  आम्ही कन्व्हेंशनच्या तारखाही जाहीर करत आहोत. तेंव्हा खालील तारखांची नोंद घ्यावी . 

जुलै ११, २०१९ - व्यावसायिक परिषद (business conference), मेडिकल परिषद (CME), उत्तररंग आणि स्वागतभोजन (banquet) 

जुलै १२-१४, २०१९ - सांस्कृतिक अधिवेशन 

अधिवेशनाच्या तयारीची अनेक कामे आता वेगात सुरु झालेली आहेत. त्यातलंच एक म्हणजे स्मरणिका तयार करणे. स्मरणिका ही खरोखरी संस्मरणीय असावी आणि ती बराच काळ लोकांच्या संग्रही असावी हा उद्देश ठेवून आमच्या स्मरणिका समितीचं काम आता सुरु झालंय. या स्मरणिकेचं मुखपृष्ठ आकर्षक असावं आणि 'सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे' या घोषवाक्याला साजेसं असावं म्हणून आम्ही स्मरणिका नाव आणि मुखपृष्ठ स्पर्धा जाहीर करत आहोत. 

smaranika

 

२०१९ च्या अधिवेशनाची ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारांपर्यंत कळवावी ही नम्र विनंती आणि त्यांनाही ह्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. 

धन्यवाद!

- दिलीप राणे