April 2018 Newsletter

आता गाडी हमरस्त्याला लागतेय. कोण ड्राईव्ह करणार, कोण नकाशा पाहणार वगैरे सगळं ठरून मंडळी आपापल्या कॅरॅक्टरमध्ये घुसतायत. पोचण्याच्या ठिकाणापर्यंतचा सगळा रस्ता नकाशात पाहून झालाय. कुठे लंच कुठे ब्रेक, कुठे डिनर असं ठरलेलं आहे. कुठे डीटूअर घ्यावी लागणार आहे, कुठे वेग कमी करावा लागणार आहे हे पाहणारे काही सूक्ष्मनियोजक प्रत्येक घरात असतात तसे इथेही आहेत. प्रवासाला सुरुवात होण्याआधी काही गोष्टी अचानक लक्षात येतात, घरातील एखादा गायबच असतो, त्याला शोधायला एक जण जातो, मग त्या दोघांना शोधायला तिसरा पाठवावा लागतो. अखेर तिघे येतात, उरलेले त्यांच्यावर थोडं तोंडसुख घेतात आणि मग एकमेकांना "दे टाळी!" असं म्हणत सगळे गाडीत बसतात. मोठ्या कुटुंबात हे घडतंच. तसं हेही एक कुटुंबच झालंय. मग इथंही ते व्हायलाच हवं. पण तो भाग आता पार पडला आहे. सगळे जण हजर आहेत, आपापली जबाबदारी सांभाळताहेत. पण सांगावंसं वाटतं. या नियोजनात कुठेही शॉर्टकट नाहीय. जे काही करायचं ते उत्तमच असेल, गुणवत्तेत कुठेच तडजोड नसलेलं असेल. हा एक असा प्रवास सुरु होतो आहे जो प्रत्येकाला समृद्धच करून सोडणारा असेल याच्याबद्दल कुणाचंच दुमत नाही. शिवाय या सर्व प्रवासावर आपले बीएमएमचे अध्यक्ष श्री. अविनाश पाध्ये यांचं बारकाईनं लक्ष आहे. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी वेळेनुसार किंवा जरा नियोजित वेळेपेक्षा जरा आधीच पूर्ण होताहेत असं सर्टिफिकेट त्यांनी दिल्यामुळे मंडळी जरा उत्साहात आहेत.

आता जरा कामाचं. काय काय झालं आहे?

अधिवेशन स्थळ - कन्व्हेन्शन सेंटरबरोबरच्या करारावर शिक्कामोर्तब व्हायला थोडा उशीर होतो आहे. कराराचा मसुदा तयार आहे. पण सेंटरचा करार आणि खाद्यपदार्थ पुरवण्याचा करार हे दोन वेगवेगळे करार एकदमच पक्के करावेत असा आपला इरादा आहे. सेंटरबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या आहेत आणि त्यांच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याकडे एप्रिपर्यंत मुदत आहे. खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या संस्थेकडून करार प्राप्त झाला आहे. त्याची छाननी चालू असून, दोन्ही करारांवर एप्रिलच्या आसपास स्वाक्षऱ्या होतील.


कार्यक्रम (स्पर्धा) - स्पर्धांचे मार्गदर्शक नियम आणि रूपरेषा यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी समिती नेमली आहे, त्यांचं काम जोरात चालू आहे.

कार्यक्रम (अधिवेशनातील) - स्थानिक तसेच भारतातून अनेक प्रस्ताव आले आहेत, येत आहेत. असे प्रस्ताव संकेतस्थळाच्या माध्यमातून स्वीकारण्यासाठी योग्य ती तांत्रिक सोय करण्यात येणार आहे त्यासाठी माहिती संकलनाचे काम चालू आहे. संकेतस्थळावर तशी सोय उपलब्ध झाल्यानंतर सर्व प्रस्ताव केवळ त्या माध्यमातूनच यावेत असे रीतसर आवाहन करण्यात येईल.

कार्यक्रम (ध्वनी, चित्रफीत, मंच, अधिवेशन स्थळ) - या सर्व समित्या एकत्र बसून लागणाऱ्या सर्व साहित्याची आणि सेवांची सूची तयार करतील. ध्वनी/चित्रफीत समितीची अशी सूची तयार असून समिती अशा सेवा देणाऱ्या जवळजवळ पाच संस्थांच्या संपर्कात आहे. लवकरच या संस्थांकडून रीतसर निविदा सूचना (RFP) मागवण्यात येतील.  


तंत्रज्ञान - अधिवेशनासाठी संकेतस्थळ निर्मितीचे काम झाले असून, संकेतस्थळ सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. संकेतस्थळाद्वारे निधी आणि देणगी स्वीकारण्याची सोय पुढील एक दोन आठवड्यात उपलब्ध करण्यात येईल.

कोष - क्रेडिट कार्डवरून शुल्क ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोषागार समिती कार्यरत आहे. त्या संबंधी लवकरच करार करण्यात येईल. त्यासाठी काही मूलभूत अशा सोई संकेतस्थळावर करणे आवश्यक असते, त्यासाठीही तंत्रज्ञान समितीबरोबर काम सुरू आहे.

निधी संकलन - २०१७ च्या शेवटी उत्तम संकलन झाल्यानंतर समिती आता वेगवेगळ्या माध्यमातून आणि योजनांतून निधी संकलनासाठी नियोजन करीत आहे. त्यामध्ये डॅलसफोर्टवर्थमधील देणगीदार, जे नेहमीच अधिवेशनाला देणग्या देतात असे दानशूर दाते, व्यायसायिक देणगीदार यांच्याशी संपर्क करणे, आणि निधी संकलनासाठी कार्यक्रम प्रायोजित करणे असे त्याचे स्वरूप राहील. या योजनांची माहिती देण्यासाठी नुकताच एक आंतरजालीय अभ्यासवर्ग (Webniar) घेण्यात आला. त्यातून देणगी योजना काय आहेत, त्यात कोणत्या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे याची माहिती उपस्थितांना मिळाली. सांगण्यात आनंद होतोय की निधी संकलनासाठी मार्च अखेरीस ठरवलेलं साधंसं लक्ष्य आम्ही नुकतंच पार केलं. मात्र पुढील लक्ष्य तुम्हा सर्वांच्या मदतीशिवाय गाठणं थोडंसं अवघड आहे. लवकरात लवकर आपली देणगी देऊन या कार्यात तुम्ही हातभार लावाल अशी आमची खात्री आहे. विविध देणगी योजनांची माहिती आपल्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चाईल्ड केअर - ही सेवा देऊ शकणाऱ्या संस्थांची माहिती संकलित करण्यात आली आहे. माहितीची छाननी चालू आहे.

उत्तररंग - उत्तररंग कार्यक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमांतर्गत काम करण्यासाठी वेगवेगळे भाग निश्चित करण्याचे काम चालू आहे.

अधिवेशन व्यवस्थापन समिती (पीएमओ)  - सर्व समित्यांच्या प्राथमिक बैठका करून घेणे, प्रत्येक समितीच्या ठळक कामांचे वेळापत्रक निश्चित करून घेणे अशी कामे पूर्ण झाली आहेत. आता ही वेळापत्रके योग्य त्या समितीपर्यंत पोचवले जात आहे. हा टप्पा अत्यंत महत्वाचा असून सर्वांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काम गंभीर आहे, पण प्रवास गंभीर नक्कीच नाही. एक नवीन आणि समाधान करणारा एक प्रवास अशा नजरेतून प्रत्येक कार्यकर्ता पाहतो आहे यात शंका नाही. आता या गतीने प्रवास काही काळ चालू राहील, वाटेत घडणाऱ्या घटना, नवीन अनुभव याबद्दल वेळोवेळी सांगत राहूच. तोवर, सप्रेम नमस्कार!

- मंदार वाडेकर