March 2018 Newsletter

कोणत्याही सोहळ्याची आखणी करायची म्हणजे किती वेगवेगळया अंगांचा विचार करायला लागतो, नाही का? लग्नकार्य असेल तर कार्यस्थळ, आमंत्रणे, पाहुण्यांचे स्वागत, धार्मिक विधी, भोजन, वरात, आहेर ....एक ना दोन, अनेक गोष्टींची तयारी आपण करतो. बृ. म. मं. अधिवेशनाचा तर केवढा भव्य सोहळा असतो! त्याची सुरुवात म्हणून आम्ही वेगवेगळया एकतीस कार्यसमित्या स्थापन केल्या. आता बहुतेक सर्व कार्यसमित्यांच्या आरंभसभा होऊन त्या जोमाने कामाला लागल्या आहेत. आमचे मुख्य कार्यकारी समितीचे निमंत्रक दिलीप राणे यांच्या शब्दांत सांगायचं तर “आमची गाडी आता दुसऱ्या गियरमध्ये जात आहे! प्रत्येक कार्याला एक ठराविक वेग असावा लागतो. अति मंद वेग किंवा अति जलद वेग असून चालत नाही ह्याचे भान ठेवून घेतलेल्या कार्याचा आराखडा बांधला जात आहे.”

कामाला वेग घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते ...ती म्हणजे सर्व समित्यांच्या कामातील सुसूत्रता आणि सुसंवाद! हा सुसंवाद साधण्यासाठी दि. १७ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.  जवळपास १५० कार्यकर्त्यांची ह्या सभेला उपस्थिती लाभली. कार्यक्रम समितीचे प्रोजेक्ट मॅनेजर मोरेश दामले यांनी या सभेची व्यवस्थापना पाहिली.  त्यावेळी प्रत्येक कार्यसमितीच्या प्रतिनिधीने आपली पूर्ण झालेली आणि नियोजित कामे सभेपुढे थोडक्यात मांडली. काही समित्यांनी तर धडाकेबाज कामे केली होती. उत्तररंग समितीचे प्रमुख श्री सुभाष गायतोंडे यांनी तर पुढल्या चार महिन्यात जरी अधिवेशन असले तरी उत्तररंग समितीची तयारी आहे असा आत्मविश्वास दर्शविला. युवा समितीचा सोशल मीडियावर प्रचार, तंत्रज्ञान समितीची अधिवेशन वेबसाईट, सुविधा समितीचे अधिवेशन स्थळाचे ‘सुविधा मार्गदर्शक’ अशी सांगण्यासारखी अनेक प्रगतीशील कामे! कुठल्याही समारंभाला निधी गोळा करणे ही महत्वाची कामगिरी असते. म्हणूनच निधी उभारणी समितीने देणगीदारांना द्यायच्या खास सुविधांची संरचना निश्चित करून सर्वांना समजावून सांगितली. मुख्य कार्यकारी समितीनेही कन्वेन्शन सेंटरशी होणाऱ्या करारावर लवकरच सह्या होत असल्याचे सांगून सभेची सुखद सांगता केली.

आपल्या सर्वांना एका गोष्टीचे कुतूहल नक्कीच असते आणि ते म्हणजे कॅवेन्शनला कुठले कार्यक्रम ठरतात याचे. अर्थात कार्यक्रम ठरायला अजून तसा  बराच अवकाश आहे परंतु तरीसुद्धा अधिकृतरित्या प्रस्ताव मागविण्यास सुरुवात झालेली नसतानाही जवळजवळ ३० कार्यक्रमांच्या सूचना, शंभरहून अधिक मुलखावेगळ्या व्यक्तींची नावे आमच्या कार्यक्रम समितीकडे आलेली आहेत यावरूनच डॅलसला होणाऱ्या या अधिवेशनासाठी किती उत्सुकता आपल्या मराठी बांधवांमध्ये आहे याची जाणीव होते. लवकरच अधिकृत प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया वेबसाईटमार्गे सुरु केली जाईल. 

असा या कामांचा प्रत्यक्ष वृत्तांत ऐकून इतर कार्यसमित्यांनाही ‘खूप काही’ करण्याची प्रेरणा मिळाली, विविध समित्यांत काम करणाऱ्या लोकांशी परिचय झाला, विचारांची देवाणघेवाण झाली. साऱ्या सभेत उत्साहाचे वारे निर्माण झाले होते. विविध अंगांनी चाललेली ही अधिवेशनाची तयारी पाहून मला तर अष्टभुजा, नव्हे, शतभुजा देवीचे दर्शन झाल्यासारखे वाटले.

तसे पाहिले तर, कोणतीही समिती स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. त्यांना आर्थिक, तांत्रिक, व्यावसायिक...अनेक प्रकारचे साह्य लागतेच आणि ते इतर समित्यांकडून मिळू शकते. त्या दृष्टीने ही सभा फारच महत्वाची ठरली. सर्व कार्यकर्त्यांना एक नवा हुरूप मिळाला आणि सभेहून परतताना सर्वांच्या  मनात एकच सूर उमटला होता....‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’.

 

-- मंजिरी जोशी