March 2019

माउली माझी मराठी, जागृती दे अस्मितेला, पूजनाचा सोहळा संमेलने आम्ही आरंभिला..

हा पूजनाचा सोहळा जवळ येत चाललेला आहे आणि संमेलनाच्या सर्व आघाड्यांवर यथासांग प्रयत्न सुरु आहेत.

कार्यक्रमासंबंधी असलेल्या बऱ्याच समितींची रूपरेषा निश्चित झाली आहे. त्याबरोबरच अधिवेशनाचे कार्यक्रम, प्रमुख अतिथी, पाहुणे कलाकार यांची देखील निवड करण्यात आली आहे . उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सराव, सजावटीची तयारी, विविध स्पर्धांच्या पुढच्या फेऱ्या आणि सर्वात महत्वाची

अधिवेशनातील मेजवानी! ती जास्तीतजास्त चविष्ट व वैविध्यपूर्ण कशी होईल हे पाहण्यात कार्यकर्ते अहोरात्र मग्न आहेत. भोजनात कुठेही कसलीच कसर पडायला नको म्हणून ते खूप कष्ट घेत आहेत.

मुख्य कार्यक्रमाची जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिका आणि यवतमाळ येथे नुकत्याच झालेल्या ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा ढेरे यांनी आपल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून येण्याची विनंती नुकतीच मान्य केली आहे. कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांची विचारप्रवर्तक भाषणशैली परदेशात राहणाऱ्या मराठी माणसाला वेगळी दिशा व प्रेरणा देईल यात शंकाच नाही.
 
प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. रवीन थत्ते हे प्रमुख वक्ते म्हणून या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेत काही वर्षे वास्तव्य केल्यानंतर ते भारतात परतले आणि प्लास्टिक सर्जरी करता करता भारतीय तत्त्वज्ञानाकडे आकर्षले गेले. त्यांची मुख्य रूची ही तर्कशास्त्र आणि विज्ञान असून त्यांनी १९९४ मध्ये त्यांचे पहिले पुस्तक लिहिले. त्यांनी ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास केला आणि प्राचीन मराठी भाषेत लिहीलेल्या ओव्यांचे इंग्रजी भाषांतर केले. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी आधुनिक शोधांच्या संदर्भात भारताच्या प्राचीन साहित्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्तंभ लिहिले. त्यांनी २०१८ मध्ये पुणे येथील डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वेद (वेविविज्ञाना) येथे झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. विचारवंत आणि वक्ते म्हणून त्यांना भारतात अनेक कार्यक्रमांमध्ये आपले विचार मांडलेले आहेत.

‘उत्तररंग’ हा आयुष्याचा पुढचा टप्पा असला तरी कार्यक्रम निश्चित करण्याच्या कामी मात्र त्यांनी आघाडी मारून तरुण मंडळींना एक नवे आव्हान दिले आहे! अतिशय हरहुन्नरी असलेल्या या समितीने कार्यक्रमांचा संपूर्ण आराखडा निश्चित केलाय, अगदी लहान तपशीलांसकट! अतिशय माहितीपूर्ण पण तेवढीच करमणूक करणारे असे हे कार्यक्रम असतील, त्यांची माहिती खालीलप्रमाणे…

 • या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी हे “ऊर्जा- एका प्रेरणेची” या विषयावर बोलणार आहेत. उतारवयात समाजोपयोगी कामात स्वतःला सक्रिय ठेवून आयुष्य सकारात्मक आनंदी कसे बनवावे याचे विवेचन करणारे हे व्याख्यान सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.
 • “गौरवरंग” -अमेरिकेत ज्येष्ठ नागरिकांची अनेक मंडळे आहेत. गेली कित्येक वर्षे अतिशय पद्धतशीरपणे त्यांचा कारभार चालला आहे. अशा बऱ्याच मंडळातील सदस्य आपल्या अधिवेशनाला हजर राहणार असून ते आपले अनुभव कथन करतील आणि इतरांना स्थानिक मंडळे कशी सुरु करता येतील यावर ते मार्गदर्शन करतील.
 • “Living In Style” – दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी आयुष्य ‘स्टाईल’मध्ये जगायचंय ? मग ही त्रिसूत्री पाळा! अतिशय हलकंफुलकं व विचारांना उद्युक्त करणारं डॉ अशोक आणि विद्या सप्रे यांचं मनोरंजनात्मक भाषण !
 • “सौंदर्य योग ”- योगिक जीवनशैली आपल्या व्यक्तिमत्वाला कशी विकसित करू शकते; त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या विविध पातळयांवर आपल्याला कसे यशस्वीपणे तोंड देता येते व उतारवय कसे सुंदर जगता येऊ शकते या विषयावर डॉ उल्का नातू आणि त्यांचे सहकारी मार्गदर्शन करतील. योगाशी संबंधित परंतु अतिशय आगळा वेगळा असा हा कार्यक्रम!
 • “आव्हाने, समस्या आणि उपाय”- चार डॉक्टरांच्या पॅनलने केलेले सादरीकरण, नंतर प्रेक्षकांच्या प्रश्नोत्तरांचे सत्र!
 • याशिवाय मनोरंजनात्मक कार्यक्रम ‘उत्तररंग’मध्ये समाविष्ट असतील.

‘उत्तररंग’ प्रमाणेच ‘बिझीनेस कॉन्फरन्स’ चा सेमिनारही संपूर्ण दिवस असेल. अतिशय माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम सगळ्यांनाच उपयोगी आहे. फ्रँच्याईझिंग, एन्जल इन्वेस्ट्मेन्ट्स अशी वेगवेगळी सत्रे त्यात अंतर्भूत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी.

https://www.bmm2019.org/my-investments-2019-business-conference/

बऱ्याच स्पर्धांनी पुढचा टप्पा गाठला आहे. “आमची भाषा ढोल ताशा” या स्पर्धेमध्ये ५ मंडळांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. अधिवेशनात या मंडळांचे जोशपूर्ण सादरीकरण सगळ्यांनाच खिळवून ठेवणारे असेल.

निवड झालेली ५ मंडळं आहेत-

 • बे एरिया स्पार्टन्स,
 • डेट्रॉइट शिव शार्दूल पथक,
 • ह्यूस्टन मोरया ढोल ताशा पथक,
 • डॅलस शिवम पथक,
 • अटलांटा आत्मीय पथक

‘सा रे ग मा’ आणि ‘वाह उस्ताद’ ह्या शास्त्रीय संगीत स्पर्धा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्या आहेत. वय ‘१२ ते २२’ आणि ‘२२ पासून पुढे’ या गटांमध्ये मिळून एकूण ११५ प्रवेशिका आल्या होत्या. पुढच्या फेरीसाठी २३ मार्चपर्यंत गाण्याचे व्हिडीओ मागवण्यात आले आहेत.

‘रंग माझा वेगळा’ या कला दालनासाठी प्रवेशिका स्विकारणे अजून सुरु आहे. विषयाची अट नाही.

त्याचबरोबर ‘टिपलेले क्षण’ या फोटोग्राफी दालनासाठी (जुरीड एक्झीबिशन) इच्छुक प्रवेशिका पाठवू शकतील. या दोन्ही स्पर्धांची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.

Topics for photography: भारतीय संस्कृती, पर्यटन, भारतीय सण व मूल्ये, व्यक्तिचित्र, निसर्ग. (भारतीय संदर्भाला प्राधान्य दिले जाईल, पण ते आवश्यक नाही)

या सर्व भरगच्च कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ मिळावा आणि लक्ष विचलितही व्हायला नको, यासाठी मुलांची काळजी घेण्याची आम्ही खूप छान सोय करतोय. नुसती काळजीच नाही तर मनोरंजन, खेळ, संगीत, हस्तकला यामध्ये ते पुरेपूर मग्न राहतील अशी आम्हाला खात्री आहे. त्याची अधिक माहिती पुढील अंकात…नमस्कार!