उत्तररंग लघुलेख स्पर्धा - वय मोठं गंमतीचं

या स्पर्धेसाठी लेख पाठविण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१९ असल्यामुळे त्यानंतर आलेले लेख स्विकारण्यास आम्ही असमर्थ आहोत.

उतारवय हे काही फक्त आजार आणि व्याधींवर चर्चा करण्यासाठी नाही, तर आनंदाने हसत खेळत आयुष्याकडे पाहण्यासाठीही आहे. याच विचारास अनुसरून, बीएमएमच्या डॅलस येथे होणाऱ्या अधिवेशनाचा एक भाग म्हणून ही लघुलेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नावाप्रमाणे, उतार वयात घडणाऱ्या विविध गंमतीजमती शब्दबध्द करण्याची संधी यानिमित्ताने तुमच्यातील लेखकाला मिळणार आहे.

अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर, कधी कधी विसरभोळेपणामुळे काही गमती होतात. गप्पांमध्ये तरुणांचा असलेला संदर्भ आणि ज्येष्ठांचा त्याबाबतीतला जुना संदर्भ ह्यातील फरकामुळेही बऱ्याच वेळा गमती होत असतात.”

भारतातून आजी-आजोबा नातवांना भेटायला येतात आणि आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचा संवाद, त्यातून आजी-आजोबा नवीन पिढीला कसे शिकवतात आणि उलट नवीन पिढी त्यांना आजकालच्या गोष्टी कशी शिकवते, हे तर आपण घरोघरी पाहतो.. खूप गंमतीशीर असतो हा सगळा सोहळा… बघू या .. तुम्ही या सोहळ्याकडे कसे पाहता ते..

मुळात मुद्दा काय आहे ? ह्या सगळ्याकडे तुम्ही कपाळावर आठी आणून पाहता की गालातल्या गालात हसून? आयुष्याचा आनंद घ्यायला ना वयाची अट आहे ना प्रसंगांची.. अट फक्त एकच.. आनंदी राहायची आणि छोट्या छोट्या प्रसंगात आनंद शोधण्याची..

मग काय.. घ्या पेन आणि कागद हाती… का keyboard घेताय ? ते तर उत्तम.. न जाणो घडलेले प्रसंग डोळ्यासमोर आणताना कदाचित आधी न जाणवलेली गंमत  तुम्हाला ह्यानिमित्ताने जाणवेल आणि तुमचा दिवस आणखी सुखद करून जाईल..

 

नियम:

या स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे:

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या, अथवा तुमच्या आजूबाजूला असलेल्या ज्येष्ठांच्या आयुष्यात घडलेल्या किंवा अगदी संपूर्ण काल्पनिक असलेले लघुलेख ही स्पर्धेत पाठवू शकता.

१.  लघुलेख मराठी भाषेतच असावेत.

२.  लघुलेखाची शब्दमर्यादा ७५० ते १०००. लघुलेखाच्या प्रारंभी, मधे अथवा शेवटी स्पर्धकाने आपले नाव लिहू नये. आपला लघुलेख FirstName_LastName_vmg.jpg / FirstName_LastName_vmg.pdf असा पाठवावा.

३.  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले लेख pdf अथवा jpg (हस्तलिखित लेखाची scanned copy) स्वरुपात  vmg.uttarrang@bmm2019.org या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत.

४.  लेख पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१९ आहे. (तरीही स्पर्धकांनी अखेरच्या दिवसातली घाई टाळून, आपले लेख लवकरात लवकर पाठवावेत.)

५.  एका स्पर्धकाला एकापेक्षा अधिक लघुलेख पाठवता येणार नाहीत.

६.  लघुलेख हे त्या स्पर्धकाने स्वतः लिहिलेले असावेत तसेच ते यापूर्वी कुठेही प्रसिध्द झालेले नसावेत.

७.  या स्पर्धेचे परीक्षण उत्तररंग समितीने नेमलेले परीक्षक करतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

८.  या स्पर्धेत परीक्षकांनी निवडलेल्या पहिल्या तीन लघुलेखांचे वाचन बीएमएम अधिवेशनाच्या उत्तररंग सदरात करण्याची संधी स्पर्धकांना मिळेल. तसेच पहिले आलेले पाच लघुलेख अधिवेशनाच्या स्मरणिकेमध्ये प्रकाशित केले जातील.

९.  निवडलेले तीनही लघुलेख वाचनासाठी त्या लघुलेखांचे लेखक स्पर्धक हे अधिवेशनाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

१०.  काही कारणास्तव विजेते स्पर्धक स्वतः या लघुलेखांचे वाचन करू शकणार नसल्यास, व तसे त्यांनी उत्तररंग समितीस कळवल्यास, समितीतर्फे लघुलेखाचे वाचन करण्याची सोय करण्यात येईल. परंतु तरीही ह्या स्पर्धकांनी अधिवेशनासाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

११.  लघुलेखातील मजकुराची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वी लेखकाची असेल. BMM अधिवेशन २०१९ आयोजन समिती लघुलेखातील कुठल्याही मजकुरासाठी जबाबदार असणार नाही.

१२.  लघुलेखात कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीचा उल्लेख टाळावा. शक्यतो काल्पनिक पात्रांचा समावेश करावा.

१३.  लघुलेखाचे सर्व हक्क स्पर्धकाकडे असतील, तरीही, उत्तररंग समितीस बीएमएम अधिवेशनाशी संलग्न ह्या लघुलेखाचे मुद्रण, प्रकाशन आणि वितरण करण्याचे अधिकार असतील.

१४.  स्मरणिकेमध्ये लघुलेख प्रकाशित करण्याआधी त्यावर (गरज वाटल्यास) योग्य ते संपादकीय संस्कार (अतिरिक्त शब्दसंख्या, व्याकरण तसेच भाषेच्या तांत्रिक बाबीतले बदल, इत्यादी) करण्याचे अधिकार बीएमएम २०१९ अधिवेशन समितीकडे असतील.

वरील नियमात न बसणारे लघुलेख हे उत्तररंग समिती व लघुलेखांचे परीक्षण करणाऱ्या परीक्षकांकडून बाद ठरवण्यात येतील.