June 2018

नमस्कार मंडळी,

आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की बीएमेम २०१९च्या अधिवेशनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे. आपल्या अधिवेशनाच्या यशासाठी दोन प्रमुख आव्हाने असतात…एक दर्जेदार कार्यक्रम आणि दुसरी उत्तम भोजनव्यवस्था! यासाठी लागणाऱ्या दोन समित्या आपापल्या कामात गर्क आहेत. यापैकी कार्यक्रम समितीच्या काही ठळक घडामोडी :

आम्ही आता बीएमेम २०१९च्या कार्यक्रमांचे प्रस्ताव स्वीकारायला सुरुवात केली आहे. या प्रस्तावांचे अर्ज आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१८ आहे. या प्रस्तावांमधून कार्यक्रम निवडले जातील. कार्यक्रम सादर करण्यात स्वारस्य असणाऱ्या आपल्या परिचितांना ही माहिती जरूर कळवा. आमच्याकडे ई-मेल आणि फोनवरून याबद्दल मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे, पण कार्यक्रम निवडीत सुसूत्रता आणण्यासाठी आमची सर्वांना विनंती आहे की आपले प्रस्ताव अर्ज आमच्या वेबसाईटवर औपचारिकरित्या सादर करावे.

उत्कृष्ट दर्जाच्या कार्यक्रमांचे प्रस्ताव प्रचंड प्रमाणावर अपेक्षित आहेत. अनेक संस्था, मंडळे आणि व्यक्ति कार्यक्रम सादर करण्याचा मानस व्यक्त करत आहेत. म्हणून कृपया आपले प्रस्ताव शक्य तेवढे लवकर पाठवावे. आपले प्रस्ताव https://www.bmm2019.org या वेबसाईटवर propoals -> programming proposals  या menu मध्ये जाऊन तुम्ही सादर करू शकता.

आपल्या संमेलनात उत्तर अमेरिकेतील स्थानिक कलाकारांचा सहभाग तर असतोच, पण भारतात नावाजले गेलेले काही कार्यक्रम पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. त्यांची निवड अधिक चोखंदळपणे करावी लागते. त्यासाठी आमचे कार्यक्रम समितीप्रमुख श्री. किरण साठ्ये व्यक्तिशः महाराष्ट्रातील अनेक कलाकारांना भेटले, अनेक कार्यक्रमांना ते स्वत: उपस्थित राहिले आणि त्यांच्या या अभ्यासपूर्ण दौऱ्याची माहिती त्यांनी कार्यक्रम समितीला दिली. आता इतकंच  सांगू शकतो की बऱ्याच व्यावसायिक कलाकारांनी आपल्या या अधिवेशनात कार्यक्रम सादर करायची तीव्र इच्छा दर्शवलेली आहे.  त्यामुळे भारतातून येणाऱ्या अनेक दर्जेदार प्रस्तावांतून ठराविक कार्यक्रमांची निवड करणे आमच्या कार्यक्रम समितीच्या दृष्टीने एक कसोटी ठरणार याबद्दल वादच नाही.

तीन दिवसांच्या या सोहळ्यात काही ठराविक कार्यक्रमांनाच  आणि कलाकारांना आपली कला सादर करायची संधी मिळते. त्याहून कितीतरी अधिक पटीने उत्तर अमेरिकेत दर्जेदार कलाकार मंडळी आहेत. याचबरोबर काही कला या आपल्या मराठी मंडळींनी वर्षानुवर्षे जोपासल्या आणि अजूनही जोपासतायत. अशा ह्या कलांना आणि त्यात निपुण असलेल्या कलाकारांना अधिवेशनासारखं  मोठं व्यासपीठ नव्याने अनुभवायची एक वेगळी संधी या अधिवेशनात असेल.  या अधिवेशनात नृत्य-संगीत-कलागुणांना वाव देण्यासाठी काही नेहमीच्या यशस्वी स्पर्धा असतीलच तर काही प्रथमच पदार्पण करणाऱ्या अभिनव स्पर्धाही! येत्या काही आठवड्यात या स्पर्धा जाहीर होतील. तेव्हा अधिक काही न सांगता फक्त एवढेच म्हणू की ‘तारखेकडे लक्ष ठेवा!’

अधिवेशनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी इतर मंडळांचे सहकार्य घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. याची सुरुवात म्हणून आम्ही ह्यूस्टन, सॅन अॅन्टोनिओ आणि सीएटल इथल्या मंडळांना भेट दिली आणि त्यांच्याकडून भरघोस प्रतिसादही आणि पाठिंबाही मिळाला. त्यांच्यासाठी हा एक खास संदेश :

“संमेलनाच्या समर्थकांनो, तुमचे मन:पूर्वक स्वागत! तुमच्या मंडळांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागात बीएमेम २०१९ संमेलनाच्या प्रचारासाठी जे कार्य केले आणि यापुढेही कराल त्यासाठी आम्ही आपले ऋणी आहोत. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तुमचे जे सहकार्य लाभत आहे ते आमच्यासाठी अतिशय मोलाचे आहे.” 

संमेलनाचे समर्थक म्हणून आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी, आपले काही प्रश्न असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी champions@bmm2019.org येथे संपर्क साधा.

लवकरच आमच्या वेबसाईटवर क्रेडिट कार्ड वापरून देणगी देण्याची सोय उपलब्ध करणार आहोत. कदाचित हे वृत्त प्रकाशित होण्यापूर्वीच ही व्यवस्था झालेली असेल. त्यामुळे तुम्हाला देणगी देणे सुकर होईल. ही सोय सध्या तरी फक्त देणगीसाठी असेल.  अधिवेशनाच्या नावनोंदणीसाठीची सोय नंतर उपलब्ध करण्यात येईल तेंव्हा त्याबद्दल आम्ही तुम्हाला कळवूच.

तर मंडळी, बरंच काही लिहिण्यासारखं आहे पण आतापुरतं एवढंच. पुन्हा आपली भेट पुढच्या ‘बीएमेम वृत्त’मध्ये! तेव्हा आणखी खूप काही सांगण्यासारखं घडलेलं असेल.

*********

बीएमेम २०१९च्या घोषवाक्यासाठी स्पर्धा घेऊन “सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे” हे छानदार घोषवाक्य निवडले गेले हे तुम्हाला माहीतच आहे. या घोषवाक्याचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला की मला त्यावर संपूर्ण कविताच स्फुरली! तर हे आहे आमचं घोषकाव्य…..

सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे! 

नव्या युगाची पहाट होता विज्ञानाची साथ सर्वदा,

पंख पसरता सृष्टीमध्ये विशाल झाली दृष्टी आता!

रंगमंदिरी साकारू मग नवोन्मेष हे कल्पकतेचे,

गात तराणे मंगलतेचे सूर गुंजती अभिनवतेचे!

 

मिरवू जगती अभिमानाने संस्कारांचे अमोल लेणे,

ऋणानुबंधा उजळू, जैसे निरांजनाचे मंद तेवणे!

घुमवू गगना जल्लोषाने उधळित झेले नवरंगांचे,

दर्शन घडवू कलागुणांचे फुलवित नाते परंपरेचे!

 

– मंजिरी जोशी