July 2018

नमस्कार मंडळी!

दर दोन वर्षांनी होणारं आपलं BMM अधिवेशन जुलै २०१९ मध्ये आमच्या डॅलसला येणार आहे हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच. ह्या अधिवेशनाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. जवळजवळ  ३०० पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि ३० हून अधिक समित्या  चांगल्या जोमाने काम करत आहेत. आमच्या अधिवेशनाच्या “उत्तररंग” ह्या समितीचा  प्रमुख ह्या नात्याने मी हे माहितीपत्र लिहीत आहे. माझ्यासोबत  राहुल पाडळीकर आणि सौ. स्वाती पंडित ही दोघं सहप्रमुख आहेत. त्याचबरोबर सुरवातीपासून आम्ही हे कार्य पती-पत्नींनी एकत्रित येऊन करावं असं ठरवल्यामुळे, माझी पत्नी सौ. सरिता, तसेच सौ. प्रिया पाडळीकर आणि श्री. आनंद पंडित सुद्धा आमच्या समितीत  जोमाने काम करत आहेत.

चाळीस किंवा पन्नास वर्षांपूर्वीपासून आपण सारे मराठी बांधव ह्या परक्या देशात येऊन स्थायिक झालो, आणि अगदी बघता बघता आपण जेष्ठ नागरिकही होऊन गेलो. हळूहळू आपल्या आवडीनिवडी आणि गरजाही बदलत गेल्या. गेली दहा-पंधरा वर्ष अनेक मराठी कार्यकर्त्यांनी ह्याबाबत अनेक संघटना स्थापन केल्या. शेवटी अनेक जणांच्या प्रयत्नाने ‘ उत्तररंग ‘ हे सदर आपल्या BMM ला सुरु करण्याची प्रथा २०१५ च्या लॉस अॅन्जेलीस अधिवेशनापासून सुरु झाली. हे घडवून आणण्यात आपल्या डॉ. अशोक सप्रे आणि सौ. विद्या सप्रे ह्या पतीपत्नींचा सिंहाचा वाटा आहे हे सर्वांना ठाऊक आहेच. अजूनही  हे  दोघेजण अविरत काम करत, मोठ्या जोमाने हे कार्य पुढे नेत आहेत. BMM ला येणाऱ्या बहुसंख्य जेष्ठ मराठी नागरिकांचा उत्तररंगात सहभागी होण्याचा उत्साहही वाढतो आहे. आमच्या डॅलसला होणाऱ्या अधिवेशनालाही  जास्तीत जास्त जण उत्तररंगाच्या सदरात भाग घेतील अशी आमची खात्री  आहे आणि त्यादृष्टीने आमची तयारी चालू आहे. ९००-१००० क्षमता असलेल्या प्रचंड मोठ्या बॉलरूम मध्ये उत्तररंग आयोजित करण्यात येणार आहे.

आता आपल्या ह्या उत्तररंगात होणाऱ्या कार्यक्रमाची थोडीफार तोंडओळख करून देतो. उत्तररंग नेहमीप्रमाणे गुरुवारी म्हणजे मुख्य अधिवेशनाच्या एक दिवस आधी होणार आहे. कार्यक्रमाचं वेळापत्रक ठरायला अजून वेळ आहे पण साधारणतः उत्तररंगाची सुरुवात सकाळी आठ-साडेआठला होईल आणि  संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी तुम्हाला अनुभवता येईल. एकूण ५ वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही करणार आहोत.  उत्तररंगाची सुरवात ‘प्रभात-लहरी’ ह्या सुमधुर संगीतमैफिलीने होईल. आमच्याच गावांतली मातब्बर कलाकार मंडळी पहाटेच्या रागावर आधारित भजन आणि भक्तिगीतं सादर करतील. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांना आनंदी व प्रसन्न वातावरणात आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. ह्या भक्तिगीतांच्या सुमधुर आठवणीतूनच आपण पुढल्या कार्यक्रमाची वाटचाल करू.

“उतारवयातील गमती-जमती”. उतारवय हे काही फक्त आजार आणि व्याधींवर चर्चा करण्यासाठी नाही, तर आनंदाने हसत खेळत आयुष्याकडे पाहण्यासाठीही आहे. आणि हाच विचार अधोरेखित करण्यासाठी, आम्ही एक लघुलेख स्पर्धा आयोजित करत आहोत. उतारवयात येणारे रोजच्या आयुष्यातील गमतीशीर अनुभव शब्दबद्ध करून आपली लेखनशैली सर्वांपर्यंत पोहोचवण्याची ही अप्रतिम संधी ह्यानिमित्ताने आपल्या मराठी बांधवांना मिळणार आहे. सध्या त्या स्पर्धेचे नियम आणि आराखडा तयार होत आहे. पुढल्या २-३ महिन्यात ह्याची अधिक माहिती ह्या BMM वृत्तात मिळेलच. शिवाय आमच्या BMM२०१९ ह्या वेब-साईटवर ह्या बाबतीत अधिक माहिती दिली जाईल. आमच्याकडे आलेल्या सर्व लघुलेखातून ५ उत्तम लेख निवडले जातील. ह्या ५ सर्वोत्तम लघुलेखकांना, आपले लेख मंचावर वाचून दाखवण्याची संधी ह्या सत्रात मिळेल. शिवाय हे ५ ही लेख BMM च्या “स्मरणिकेत” प्रसिद्ध केले जातील.

उतारवयात आपल्यासमोर बरीच नवी आव्हाने आणि समस्या येतात. त्यावरचे काही नवीन उपाय हे बऱ्याच जणांना ठाऊकही नसतात.  यासाठीच  “आव्हाने, समस्या आणि उपाय” असा साधारण अडीच तासाचा अवधी ह्या चर्चासत्रासाठी राखून ठेवणार आहोत. उतारवयात अनेक व्याधी डोकं वर काढू लागतात. ह्या व्याधींची लक्षणे, त्यांच्यावर उपचार आणि नियंत्रण कसे करावे, ह्याबाबतीत ४ नामवंत डॉक्टर्स दीड तास चर्चा आणि मार्गदर्शन करतील. शेवटचा एक तास श्रोत्त्यांकडून येणाऱ्या प्रश्नोत्तरासाठी ठेवण्यात येईल. शिवाय आम्ही ह्या सर्व डॉक्टर्सना त्यांच्या विषयावर लेख लिहिण्याची विनंती करणार आहोत. हे लेख आम्हीं ‘स्मरणिकेत’ प्रसिद्ध करणार आहोत.

“योग आणि स्वास्थ्य”: योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी मानली जाते. तरुणपणी अनेकजण योगशास्त्रात शिरतात. योगाच्या साहाय्याने उतारवयातही अनेक व्याधी आपण दूर करू शकतो. ह्या विषयातील सखोल अभ्यास असणाऱ्या नामांकित तज्ञांशी आम्ही ह्या सत्राचा आराखडा ठरवण्यासाठी बोलणी करत आहोत. हे सत्र सुमारे दीड तास चालेल. योग्य प्रतिसाद मिळाल्यास योगाचं प्रात्यक्षिक सत्र अधिवेशन काळात इतर दिवशी घेण्यात येईल.

आपल्या उत्तररंगाची सांगता “Living in Style” ह्या सत्राने होणार आहे. ह्या भागात सप्रे पती-पत्नी, त्यांनी मिळवलेली Senior Living ह्या विषयाची सखोल  माहिती आपल्याला देतील. त्यात, ते सध्या अमेरिकेत तसेच पुण्या-मुंबईत सुरु असलेल्या Real Estate Projects  बद्दलही  माहिती  देतील.

आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की, ह्या संपूर्ण दिवसाच्या उत्तररंगाच्या कार्यक्रमांना सुसूत्रतेने एकत्रित बांधण्यासाठी एका निष्णात सूत्रधाराची आवश्यकता आहेच .. नाही का ? त्यादृष्टीनेही आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी एखाद्या व्यावसायिक निवेदिकेला किंवा सूत्रधाराला बोलावण्याचा आमचा मानस आहे.

तर मित्रहो, आता तुम्हाला पटलंच असेल की आमची “उत्तररंग” ह्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी चालू आहे. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. आमच्या इथल्या तरुण कार्यकर्त्यांकडूनही प्रचंड हातभार आणि प्रोत्साहन उत्तररंग यासाठी मिळत आहे. उत्तररंग म्हणजे फक्त साठी उलटलेल्या व्यक्तींसाठी नसून काही जाणकार व्यक्ती आपल्या चाळिशीतच या सदरात भाग घेऊन आपले पुढले आयुष्य सुखकर बनवतील अशी आमची आशा आहे. आमच्या ह्या प्रयत्नाला आपल्या सर्वांचा  भरपूर प्रतिसाद मिळेल ह्यात शंकाच नाही.

तर येणारना आमच्या डॅलसला?

-सुभाष गायतोंडे

उत्तररंग समिती प्रमुख

BMM, 2019