January 2019

“एक एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला,
जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वारे”……नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
खरंच, हे नववर्ष मराठी डॅलसकरांना आगळं वेगळं ठरणार आहे! म्हणता म्हणता अधिवेशनाच्या नोंदणीचे काम सुरू झालं! केवळ काही दिवसांतच जवळपास ११०० लोकांनी नोंदणी करूनही  टाकली!
हॉटेल बुकिंग, ग्रुप सिटिंग, देणगीदारांना विशेष सुविधा, अर्ली बर्ड बुकिंग याची चोख व्यवस्था करण्यात नोंदणी समितीचे कार्यकर्ते मग्न आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी गरज पडल्यास व्हिलचेअर, मोटराइज्ड स्कूटर असिस्टन्स याचीही व्यवस्था करण्यात येत आहे जेणे करून त्यांना अधिवेशनाचा आरामदायी अनुभव मिळू शकेल.
मुख्य अधिवेशनाप्रमाणेच आदल्या दिवशीचा मेजवानीचा कार्यक्रम (Banquet), गुंतवणुकीच्या सल्ल्यासाठी बिझनेस कॉन्फरन्स, CME (Continuing Medical Education) आणि उत्तररंग यांची तिकीटेसुद्धा उपलब्ध आहेत. करमणुकीसोबतच मराठी माणसांची सर्वांगाने उन्नती कशी होईल या विचाराने हे अतिरिक्त कार्यक्रम आखले गेले आहेत. अर्ली बर्ड रजिस्ट्रेशनची सुविधा जानेवारी ३१ पर्यंतच आहे .  https://www.bmm2019.org/registration-faqs/ या संकेतस्थळाला भेट देऊन सर्वजण  या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता.
बीएमेमच्या परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस विशेष मेजवानीचा कार्यक्रम (banquet) असतो.
२०१९ चे अधिवेशनही याला अपवाद नसेल. या निमित्ताने देणगीदार, प्रायोजक, हितचिंतक अशा खास पाहुण्यांसह या शाही मेजवानीत सहभागी होणाऱ्या सर्वांचं नाविन्यपूर्ण रीतीने आदरातिथ्य  करण्याची सुवर्णसंधी यजमान मंडळाला मिळणार आहे. मुख्य अधिवेशनाच्या शुभारंभापूर्वी, म्हणजे गुरुवार दिनांक ११ जुलै २०१९ रोजी, सायंकाळी ही मेजवानी ठेवण्यात आली आहे. हा कार्यक्रम अधिवेशनाच्या स्थळी एका भव्य दालनात होईल.
११ जुलै रोजी दिवसा होणाऱ्या कार्यक्रमांना (बिझनेस कॉन्फरन्स, CME, उत्तररंग) तुम्ही उपस्थित राहणार असाल किंवा त्याच दिवशी संध्याकाळी चार-पाचच्या सुमारास अधिवेशनस्थळी पोहचत असाल तर ही मेजवानी खास तुमच्यासाठी आहे. मस्तपैकी फ्रेश होऊन मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत, हलक्या फुलक्या वातावरणात यथेच्छ भोजन करण्याची ही सुसंधी आहे! भारतातून आलेल्या कलाकारांनी सादर केलेली कर्णमधुर संगीताची मैफिलही या banquet मध्ये सादर केली जाईल.  मेजवानी समिती आपल्या इतर स्वयंसेवकांसहित कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यात कार्यरत आहे. मेजवानीचा थाट-माट, खाद्यपदार्थांचा बेत आणि दालनाची सजावट ह्या सर्वांतून पाहुण्यांना टेक्सास पद्धतीच्या स्वागताची एक झलक मिळेल.
या कार्यक्रमाची सविस्तर माहिती अधिवेशनाच्या संकेतस्थळी लवकरच उपलब्ध होईल. विशेष म्हणजे या मेजवानीसाठी ५०० हून अधिक लोकांनी बुकिंग केलेले आहे. तिकिटांची संख्या मर्यादित आहे, त्यामुळे निराशा टाळण्यासाठी लवकरच आपले बुकिंग करावे. अधिवेशनाच्या तिकीटाव्यतिरिक्त ह्या मेजवानीचे वेगळे तिकीट काढण्याची आवश्यकता आहे याची कृपया नोंद घ्यावी. काही देणगीदारांना या मेजवानीसाठी निशुल्क प्रवेश असेल.
आता थोडी माहिती आपल्या कार्यक्रमांविषयी! कन्व्हेन्शन मध्ये इतर गोष्टींबरोबर करमणूक असणे हा एक मुख्य घटक!  मराठी रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे दर्जेदार कार्यक्रम आणण्यात आमची समिती अतिशय  मेहनत घेत आहे. चोखंदळ मराठी रसिकांच्या पसंतीला पडण्यासाठी मातब्बर कलाकार तर हवेतच आणि त्याचबरोबर नवीन उभरते कलाकार असावेत हे आम्ही जाणतो.
मराठी सिनेसृष्टीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत. या  कामात आघाडीवर असलेला कलाकार म्हणजे सुबोध भावे! तो येतोय आपल्याशी ‘रुबरु’ करण्यासाठी! त्याबरोबरच हिंदी- मराठी चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत हे क्षेत्र अनेक वर्ष गाजवणारे आपले लाडके संगीतकार अशोकजी पत्की आपल्याला मराठी जगताची संगीतमय सफर घडवतील आपल्या ‘सप्तसुरां’मधून! मुलांसाठी चारुहास पंडित यांचा ‘चिंटू’ येतोय, तसंच आजोबा आणि नातीच्या उत्कट नात्यावर आधारलेलं नाटक ‘डिअर आज़ो’ सादर होणार आहे. इंडियन ड्रामास्कूलचे हृषिकेश जोशी घेऊन येताहेत एक धम्माल कॉमेडी  “Just असंच”! त्यांच्या नेहेमीच्या तुफान विनोदी खुमासदार शैलीत ते जगात भेटलेल्या माणसांचे इरसाल नमुने सादर करतील. आयुष्य कसे जगावे हे सांगणारे एक NON-आध्यात्मिक प्रवचनही सादर होणार आहे. ज्ञान, अध्यात्म, मनोरंजन आणि प्रबोधन यांचा अपूर्व संगम म्हणजेच डॉ. संजय उपाध्ये यांच्यासोबत दोन तासांची दर्जेदार हास्यदंगल!! कालिदासाचे सर्वांगसुंदर खंडकाव्य मेघदूत याची कथा, मेघाचा प्रवास, अलकानगरीचं सौंदर्य हे पाहतानाच त्यातली रंगसंगती, शब्दलालित्य, कल्पनांचा बहर या साऱ्याचा रसास्वाद साध्यासोप्या मराठी शब्दात मांडणारं धनश्री लेले यांचं कथन हे असेल आणखी एक आकर्षण!
हे कार्यक्रम आपल्याला नक्कीच अर्थपूर्ण आणि निखळ करमणूक देतील यात शंका नाही. याशिवाय आणखी कार्यक्रमांची नावे कार्यक्रम समिती लवकरच जाहीर करणार आहे, त्यात काही उत्तर अमेरिकेतले बरेच दर्जेदार कार्यक्रम आमच्या समितीने निवडलेले आहेत.
चला तर मग ‘अर्ली बर्ड’ योजनेचा फायदा त्वरित घ्या आणि करा रजिस्ट्रेशन आपल्या मित्रमंडळींसोबत. भेटू या… नवीन वर्षात आमच्या डॅलसला!

– मंजू रुईकर