February 2019

नव्या वर्षाच्या आगमनाने अधिवेशनाच्या तयारीचा जोम वाढला आहे. ‘आता याच वर्षी आपलं अधिवेशन आहे, बरं का! चला, कामाचा वेग वाढवू या’ अशा भावनेने कामांची ठरवलेली मुदत गाठली जात आहे.
प्रत्येक समिती मौक्तिकासारखं बहुमोल काम करत आहे, पण त्या मोत्यांचा सर बनवायला एक सूत्र लागतंच! नियमितपणे होणारी आमची सर्वसाधारण सभा अशा सूत्राचं काम करते. शनिवार दि. १२ जानेवारीला अशी ही सभा झाली. या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे बहुतेकजण बीएम्एम् २०१९ चा लोगो असलेले टी-शर्ट घालून आले होते.
‘ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु’ या प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली. सुकाणू समितीच्या सदस्यांनी पॉवर पॉईंटच्या सहाय्याने चालू घडामोडींचा आढावा घेतला. भारतातील कलाकारांच्या कार्यक्रमांत सर्वांनाच विशेष रस असतो. अधिवेशनासाठी नाट्य, संगीत, व्याख्यान, कॉमेडी असे विविध कार्यक्रम घेऊन सर्वश्री सुबोध भावे, संजय मोने, हृषिकेश जोशी, डॉ. जगन्नाथ दिक्षित, आर्या आंबेकर, हृषिकेश रानडे, प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की असे अनेक मान्यवर कलाकार भारतातून येणार आहेत. लहान मुलांसाठी खास “चिंटू तुमच्या भेटीला” हा कार्यक्रम आणि त्याचबरोबर कार्टून्स कशी बनवतात याची प्रात्यक्षिकं लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही आवडतील अशी आमची खात्री आहे. अजूनही भारतातील काही कार्यक्रम निश्चित  व्हायचे आहेत. कार्यक्रम निश्चित होताच त्यांची  माहिती अधिवेशनाच्या bmm2019.org या संकेतस्थळावर, तसेच फेसबुकसारख्या माध्यमातून रसिकांपर्यंत वेळोवेळी पोचवली जात आहेच! आणि बरं का! तेवढ्याच ताकदीचे उत्तर अमेरिकेतूनही कार्यक्रम ठरतायेत. न्यू जर्सीतील थिएट्रिक्स ग्रुप आपल्या सर्वांचे लाडके पु. ल. यांची गाजलेली “बटाट्याची चाळ” प्रत्यक्ष स्टेजवर उभी करणार आहेत. बालगंधर्व ते बकुळ पंडित अशा कलाकारांची एकाहून एक सरस अशी नाट्यगीते आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरूनही एक मोठं गाजलेलं नाटक या अधिवेशनात सादर होणार आहे. या व्यतिरिक्त गाणी, नृत्य, विनोदी एकपात्री प्रयोग असे विविधरंगी कार्यक्रम येणार आहेत आपल्या मनोरंजनासाठी.
उत्तर अमेरिकेतील तरुण मंडळींसाठीही तरुण मंडळीच त्यांच्या कार्यक्रमांचा आराखडा तयार करत आहेत. त्यात “स्पीड डेटिंग”, “मीट अँड ग्रीट”,”scavenger hunt”, “night out” आणि शक्य झाल्यास फॅशन शो, मेहेंदी असे अनेक कार्यक्रम ठरताहेत. बऱ्याच जणांनी (बहुतेक या तरुणांच्या पालकांनी) “matrimonial services” असतील का अशी आमच्याकडे विचारणा केली आहे. यासाठी चांगला प्रतिसाद असेल तर नक्कीच अशी योजना आम्ही आखू शकतो. एका मॅट्रिमोनिअल सर्विसेस कंपनीबरोबर स्पॉन्सरशिपची बोलणी सुद्धा सुरु आहेत.
अधिवेशनाच्या निमित्ताने जाहीर झालेल्या विविध स्पर्धा आणि त्यांना मिळणारा भरघोस प्रतिसाद याचीही या सभेत माहिती देण्यात आली. ‘ढोलताशा’ स्पर्धेची अंतिम तारीख उलटली असून इतर स्पर्धांच्या प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१९ आहे. स्मरणिकेचं नाव सुचविण्याच्या स्पर्धेत डेट्रोईटचे श्री. सुशांत खोपकर हे विजेते ठरले आहेत आणि त्यांनी सुचवलेलं ‘गुंजन’ हे नाव निश्चित झालं आहे.
अधिवेशनाच्या प्रवेशनोंदणीचं काम जोरात सुरु आहे. अधिवेशनाला सहा महिने अवधी असूनही दोन हजारहून अधिक प्रवेशनोंदणी आत्ताच झाली आहे. हा वेग पाहता लवकरच अधिवेशन ‘हाउसफुल’ होणार असा अंदाज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबून होणारी निराशा टाळण्यासाठी शक्यतो लवकर आपली प्रवेशनोंदणी करावी ही सर्वांना विनंती! प्रवेशनोंदणीबरोबरच नजीकच्या हॉटेलांमध्ये आम्ही सवलतीच्या दरात रुम्स उपलब्ध केलेल्या आहेत. Omni Hotel आणि Aloft Hotel येथे राखून ठेवलेल्या रुम्स संपल्या आहेत, पण Hyatt Regency Hotel मध्ये अजून सवलतीच्या दरात रुम्स मिळू शकतील. Hyatt Regency Hotel हे कन्व्हेन्शन सेंटरहून फक्त ०.६ मैल दूर असले तरी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठीही प्रवेशनोंदणी लगेच केलेली बरी!
येणाऱ्या अधिवेशनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे NGO Summit! या द्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. भारतातील ‘पानी फौंडेशन’ सारख्या काही नामांकित सेवाभावी संस्था आणि त्याबरोबर भारत आणि उत्तर अमेरिकेतील इतर सेवाभावी संस्था त्यांच्या कार्याची माहिती देतील. सर्वांनाच ‘काहीतरी’ समाजोपयोगी काम करावं असं वाटत असतं, त्यांना यामुळे योग्य दिशा सापडेल!
एक्स्पो बूथचीसुद्धा नोंदणी आता सुरु झाली आहे. सुमारे सत्तर बूथ उपलब्ध असले तरी ते ज्या वेगाने भरत आहेत ते पाहता बूथ घेण्याच्या विचारात असणाऱ्यांनी त्वरा करावी. अमेरिकेतील मराठी ग्राहकाशी संपर्क साधण्यासाठी ‘बीएम्एम् अधिवेशनातले एक्स्पो-बूथ’ ही व्यावसायिकांची प्रथम पसंती असते. दर दोन वर्षांनी मिळणाऱ्या या संधीचा लाभ अमेरिकेतील तसेच भारतातील बांधकाम व्यावसायिक, दागिने व कपड्यांचे व्यापारी, शिक्षण संस्था, सेवाभावी संस्था इत्यादि आवर्जून घेत असतात. इथे सुमारे चार हजार आंतर्राष्ट्रीय ग्राहकांशी सलग तीन दिवस संपर्क साधता येतो. या वेळच्या अधिवेशनात ग्राहकांशी अधिकाधिक संपर्क व्हावा म्हणून आम्ही काही उपाय योजत आहोत, उदाहरणार्थ,
* एक्स्पो हॉलमध्ये “चित्रकला प्रदर्शन” आणि “फोटोग्राफी प्रदर्शन” सुद्धा ठेवण्यात येणार आहे.
* इतर काही छोटे-मोठे कार्यक्रमही एक्स्पो दालनात असतील.
* प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी काही ठराविक स्टॉल्सबद्दल प्रेक्षकांना वेळोवेळी माहिती देण्यात येईल.
बूथसाठी अजूनही बऱ्याच काही योजना आम्ही आखत आहोत. एक्स्पोची सर्वसाधारण माहिती www.bmm2019.org/expo-information या संकेतस्थळावर आहेच, पण तुमच्या व्यावसायिक मित्रांना या नव्या योजनांचीही जरूर माहिती द्या!
अशाप्रकारे अधिवेशनाचे वारे जोरात वहात असले तरी ते मराठी कुटुंबांतून! आसपासच्या परिसरातही त्याची हवा निर्माण होण्यासाठी मार्च महिन्यात एक fun-run आयोजित केली आहे. बीएम्एम् अधिवेशनाचे टी-शर्ट घालून आबालवृध्द ५ किलोमीटर किंवा १ मैल पळण्यासाठी कोपेल येथील पार्कमध्ये जमतील. त्यावेळी ‘हे कसले अधिवेशन आहे’ असं कुतूहल लोकांच्या मनात सहजच निर्माण होईल आणि सर्वांना अधिवेशनाची माहिती मिळेल अशी आयोजकांना खात्री वाटत आहे.
यापुढील वृत्तांमध्ये खूपखूप काही सांगण्यासारखं असेल, पण आता येथेच थांबते! तर मग भेटूया पुढच्या महिन्यात!