Convener's Message

Dilip Rane

नमस्कार मंडळी,

बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १९वं अधिवेशन आमच्या डॅलस फोर्टवर्थ येथे जुलै २०१९ मध्ये होणार आहे याचा आम्हाला अतिशय आनंद होतोय. अमेरिकेतील तसंच अमेरिकेच्या बाहेरून येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करायला डॅलस फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळ उत्सुक आहे. या अधिवेशनाला आपण सहकुटुंब, सहपरिवार डॅलसला यावं हे आमचं आग्रहाचं आमंत्रण! 

"इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी". बृहन्महाराष्ट्र मंडळाचं पहिलंवहिलं अधिवेशन १९८४ मध्ये झालं तेव्हा फक्त अडीचशे लोकांची उपस्थिती होती. अमेरिकेच्या कर्मभूमीत सांस्कृतिक सोहळ्याचं लावलेलं  ते रोप रुजलं आणि आज त्याचा वेलू गगनावरी झेपावतोय. आज जवळ जवळ ४०००-४५०० लोकं मराठी भाषेच्या, कलेच्या, आणि संस्कृतीच्या प्रेमापोटी अधिवेशनाला जमतात. 

आपल्या मराठी परंपरेबद्दलचा अभिमान किंचितही कमी न होऊ देता, या देशात राहून या पुढे येणाऱ्या पिढीचे नवे  विचार, नव्या पद्धती यांना वाव द्यावा व त्यांना ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे असा आमचा मानस आहे. हे करताना सर्व वयोगटातील लोकांसाठी हे अधिवेशन म्हणजे एक पर्वणी असेल यात माझ्या मनात मुळीच शंका नाही. "सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे" ह्या आमच्या घोषवाक्याशी आम्ही एकनिष्ठ राहू याची शाश्वती मी देतो. 

अतिशय आनंदाची बाब सांगायची म्हणजे अधिवेशनाच्या तयारीसाठी ३१० कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा मिळाला आहे आणि अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अधिकाधिक सुखद अनुभव कसा मिळेल यासाठी हे सर्व कार्यकर्ते अगदी काटेकोरपणे आराखडे बांधत आहेत. आपण सर्वजण मोठ्या संखेने "या आपल्या" अधिवेशनाला उपस्थित राहाल आणि या सर्व कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवाल याची आम्हांला खात्री आहे. याबरोबरच, हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी बऱ्याच जणांनी देणगीरूपाने आर्थिक हातभार लावला आहे आणि यापुढेही अनेक जण अशी मदत करतील याची आम्हाला खात्री आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच ३५ वर्षांपूर्वी सुरु केलेली ही परंपरा आपण सर्वजण पुढे नेत आहोत त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो. 

डॅलस मधल्या तमाम मराठी मंडळींच्या वतीने, या "आपल्या घरच्या" उत्सवात सहभागी व्हा अशी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो. 

आंम्ही बनविलेलं हे विडियो आमंत्रण कृपया आवर्जून पहा आणि इतरांना सुद्धा पाठवा. 

https://www.youtube.com/watch?v=sosS6HVU7No&t=8s

तर मग मंडळी, येणार ना डॅलस फोर्टवर्थला?

आपला विनम्र,

दिलीप राणे

(संयोजक)