आपणा सर्वांना कळविण्यास अतिशय आनंद होतो की आपल्या अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्या आहेत सुप्रसिद्ध साहित्यिका आणि यवतमाळ येथे नुकत्याचझालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे!!

भारतीय ज्ञानपरम्परेचा वारसा समर्थपणे चालवणारे जे लेखक आहेत, त्यात अरुणा ढेरे यांचे नाव अग्रगण्य आहे. डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे या ज्ञानावृक्षाच्या सावलीत त्या मोठया झाल्या असल्या तरी तरी त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत त्यांनी केलेले लेखन ही त्यांची मोलाची कामगिरी आहे. गेली चाळीस वर्षे त्या सातत्याने लेखन करीत आहेत. कविता, कथा-कादंबरी, ललित लेखन, सामाजिक इतिहासपर लेखन, लोकसंस्कृती आणि अभिजात संस्कृती यांचा अनुबंध उलगडणारे लेखन, स्त्री विषयक लेखन आणि मिथकांचा उलगडा करणारे लेखन अशा विविध वाङ्मयप्रकारांतील आणि विविध विषयांवरील लेखनाबरोबरच त्यांनी कुमारवयीन मुलांसाठीही लेखन केले आहे. जुन्या कवींनी देऊ केलेला अस्सल भारतीय म्हणावा असा आश्वासक कवितेचा वसा सांभाळीत दुभंगलेल्या काव्यविश्वाला समांतर अशी एक होकाराची आणि मळभातून प्रकाशाची तिरीप शोधणारी कविता त्यांनी मराठी कवितेला दिली आहे. अनाग्रही वृत्तीने त्यांनी व्यासंग, अभ्यास आणि प्रगल्भ संशोधकीय दृष्टीने केलेले संशोधनात्मक लेखनही मराठीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आहे. धर्म,संस्कृती, समाजशास्त्र, लोकसाहित्य, प्राचीन आणि अर्वाचीन वाङ्मयेतिहास अशा विविध ज्ञानशाखांमधील संदर्भबहुलतेतून मानवी जीवनाचा व्यापक आणि व्यामिश्र पैस अरुणा ढेरे यांच्या लेखनातून प्रकट होतो. अनुवाद आणि महत्त्वपूर्ण संपादने यांचाही उल्लेख त्यांच्या सर्जनशील लेखनासोबत करायला हवा.

चाळीसपेक्षा अधिक पुस्तके, आणि मानसन्मान लाभलेल्या अरुणा ढेरे या वर्षीच्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षा आहेत. नव्या पिढीतील अभ्यासकांना समृद्ध ज्ञानपरम्परेशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून ‘डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राची’ कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. त्याच या संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

त्यांना समक्ष भेटूया BMM२०१९ अधिवेशनामध्ये!